मुंबई : विघातक शक्ती आता घातपाती कृत्यांसाठी अत्याधुनिक साधने वापर असल्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
__महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी मरोळ येथे आयोजित केलेल्या संचलन समारंभात ते बोलत होते. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वज प्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.या पहिल्याच संचलनात मानवंदना स्वीकारण्याची संधी मिळाल्या बद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा क्षणआयुष्यातीलअनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता.हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांसाठी या अभय मुद्रा वरील ब्रीदवाक्य प्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताणतणाव स्वीकारून इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.