कल्याण : मुंबई-बडोदा रस्ते विकास प्रकल्पबाधित झालेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी महिलेने शुक्रवारी सायंकाळी कल्याण प्रांत कार्यालयात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुसुम सुरोशी (५७, रा. रायता) असे तिचे नाव असून, तिच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कुसुम यांची जमीन मुंबई-बडोदा रस्ते प्रकल्पात बाधित होत आहे. या बदल्यात त्यांना एक कोटी तीन लाख ६९ हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी त्या कल्याणच्या प्रांत कार्यालयात पाठपुरावा करीत होत्या. मात्र, त्यांचा मोबदला दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे कळताच त्यांनी शुक्रवारी सायंकाळी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी नितीन महाजन यांच्या समक्षच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. सुरोशी यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले.सुरोशी यांचा मुलगा निखिल म्हणाला, जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी आम्ही वर्षभरापासून प्रयत्नशील आहोत. परंतु, आमच्या बाबत पमनानी नामक व्यक्तीने हरकत घेतल्याने मोबदल्याची रक्कम प्रांत कार्यालयाने त्यांच्या नावे बँकेत जमा केली. आमच्यावर अन्याय झाल्याने माझ्या आईने कीटकनाशक प्राशन केले. मात्र, आता प्रांताधिकाऱ्यांनी पमनानी यांना दिलेली रक्कम स्थगित केल्याचे आदेश काढल्याचे पत्र मला दिले आहे.
मोबदल्यासाठी कल्याणप्रांत कार्यालयात शेतकरी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न