मुंबईला भरली हुडहुडी

१० जानेवारीनंतर मुंबईत पुन्हा गारवा वाढणार



उत्तर आणि मध्य महाराष्ट्राला हुडहुडी भरली असताना मुंबईतील तापमानही बऱ्यापैकी घटले आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच जानेवारी तील सर्वाधिक कमाल तापमान २६.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. मुंबईसाठी पुढील संपूर्ण आठवडा थंडीचा असेल, या कालावधीत किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यत असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.१२ जानेवारी २०१४ मध्ये मुंबईचे कमाल सर्वाधिक तापमान २६ अंश नोंदले गेले होते. त्यानंतर यंदा जानेवारीत प्रथमच २६.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. ही नोंद सरासरीच्या ४.५ अंशाने कमी आहे. हे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नोंदले गेले आहे.उत्तर भारतातील शीतलहरींचे वारे वाहत असल्याने मुंबईचे तापमान कमी झाले आहे. त्यामुळेच आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाले असल्याची माहिती भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ एस. जी. कांबळे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील किमान तापमानातही २ अंशांची घट झाली असून ते १७.५ वरुन १५.५ इतके झाले असल्याचे हवामान विभागातील पश्चिम क्षेत्राचे उपमहासंचालक के. एस. होसलीकर यांनी दिली आहे. हवेचा बदलेल्या प्रवाहामुळे तापमानात घट झाल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत त्यात बदल होणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट या हवामानविषयक संस्थेने म्हटले आहे की, ९ किंवा १० जानेवारीनंतर मुंबईत पुन्हा गारवा वाढणार आहे.महाराष्ट्रासह, गुजरात राजस्थान या राज्यांत तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे. हवामान बदलाचा परिणाम हवेतील घटकांवर होणार असून हवेचा गुणवत्ता दर्शक २१० (खराब) नोंदला जाणार आहे.