लग्न, वाढदिवस खर्चावर निबंध, _ आगरी महोत्सवात निर्णय

बदलापूर : आगरी समाजातील लग्न, हळद आणि वाढदिवस हे खर्चिक बाब झाली आहे. आगरी समाज आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत असताना खर्चावर निबंध राहत नाही. मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची फॅशन समाजात रूढ झाली आहे. त्यामुळे बदलापूरमधील आगरी महोत्सवात बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील समाज बांधवांनी या खर्चावर निर्बध घालण्याचा ठराव केला.सर्वात आधी समाजातील राजकीय नेत्यांनी हा वायफळ खर्च बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसांवर लाखोंचा खर्च न करता हा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या वाढदिवसाच्या खर्चापैकी काही रक्कम समजाच्या उन्नतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे जिल्ह्यात अनेक महोत्सव भरविले जातात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधी अनेक महोत्सव भरवून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र बदलापूरमध्ये नुकत्याच झालेला आगरी महोत्सव हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता या महोत्सवात आगरी समाजातील वाढत चाललेला वाढदिवसाच्या प्रथा बंद करण्याचा ठराव करण्यात आला. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील आगरी बांधवांनी या पुढे आपले वाढदिवस दिमाखात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्न आणि हळदी समारंभावर होणारा अवास्तव खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने वाचणारा पैसा सामाजिक कामासाठी वापरण्यावर एकमत झाले आहे.